गौतम बचुटे/केज:- तू लय माजलास, असे म्हणत केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे एका इसमाला चौघांनी लोखंडी पाईप, काठी आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत संबंधित इसमाचा हात फ्रॅक्चर झाला असून जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास चंदन सावरगाव ता. केज येथील दत्तात्रय गौतम पोपळघट हे घरी असताना ज्ञानेश्वर गणपत इंगळे हा त्यांच्या घरी आला आणि त्याने दत्तात्रय पोपळघट यांना शिवीगाळ करून चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी नातेवाईकांनी मध्यस्थी करून दोघांच्या भांडणाची सोडवासोडव केली होती.मात्र त्यानंतर काही वेळाने दत्तात्रय पोपळघट व त्यांचे दोन भाऊ असे तिघे जण कामा निमित्त गावातील बस स्टँडवर गेले असता तेथे ज्ञानेश्वर गणपत इंगळे, जीवन आप्पाराव तपसे, मारोती जीवन तपसे आणि अशोक मेटे हे चौघे जण आले. त्यातील अशोक मेटे हा दत्तात्रय पोपळघट यांना म्हणाला की, तू लय माजलास, असे म्हणून त्याने अगोदर झालेल्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.त्यानंतर ज्ञानेश्वर गणपत इंगळे, जीवन तपसे व मारोती तपसे यांनी दत्तात्रय पोपळघट आणि त्यांच्या दोन्ही भावांना चापटाने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या हातातील लोखंडी पाईपने दत्तात्रय यांच्या उजव्या हातावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. तिघा भावांना मारहाण केली.
मारहाणीत गंभीर जखमी
या मारहाणीत दत्तात्रय पोपळघट यांच्या हाताला गंभीर जखम होऊन फ्रॅक्चर झाले आहे.जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर प्रथम युसूफ वडगाव येथील सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे हलविण्यात आले.या प्रकरणी जखमी दत्तात्रय पोपळघट यांच्या तक्रारीवरून युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर गणपत इंगळे, जीवन आप्पाराव तपसे, मारोती जीवन तपसे आणि अशोक मेटे या चौघांविरुद्ध गु.र.नं. २९१/२०२६, कलम ११५(२), ११८(१), ११८(२), ३५२, ३५२(२), ३(५) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल केशव खाडे हे करीत आहेत.
