गौतम बचुटे /केज : केज तालुक्यात बोगस डॉक्टरांवर कारवाई सुरू असतानाच केज तालुक्यातील साळेगाव येथे विना परवाना सुरू असलेले आरोग्य तपासणी शिबिर आरोग्य विभागाने बंद केले आहे. तपासणी करणाऱ्यांकडे वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत.
केज तालुक्यातील साळेगाव येथे दि. ३१ ऑक्टोबर रोजी हनुमान मंदिरात ‘उम्मीद एक नयी किरण आयुर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘स्पर्श हेल्थ केअर’ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रति रुग्ण ५० रुपये नोंदणी फी घेऊन ४ ते ५ हजार रुपयांच्या किमतीच्या तपासण्या अवघ्या ५०० रुपयांत केल्या जात असल्याचा दावा आयोजक करत होते. एटीएम डिजिटल मशीनद्वारे ईसीजी, बीपी, शुगर, हिमोग्लोबीन, बॉडी फॅट, बीएमआयसह अनेक तपासण्या केल्या जात होत्या.याची माहिती मिळताच केजचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल मुंडे यांच्या सूचनेवरून ग्रामीण आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिला कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
डॉक्टरांकडे वैद्यकीय प्रमापत्रांचा अभाव
पथकाने आयोजकांकडे शिबिराच्या परवानगीची आणि वैद्यकीय प्रमाणपत्रांची मागणी केली असता, कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यामुळे डॉ. कांबळे यांनी हे शिबिर तात्काळ बंद केले.तथाकथित डॉक्टरांकडे प्रमाणपत्रच नाहीवैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांनी चौकशी केली असता, तपासणी करणारी महिला सोनिया प्रकाश सैंदाने हिने आपले शिक्षण बीएचएमएस असल्याचे सांगितले, मात्र नोंदणी प्रमाणपत्र दाखवू शकली नाही. तर दुसरा व्यक्ती कृष्णा हरिदास मंजुळकर याने डीएमएलटी केल्याचे सांगितले, पण त्याच्याकडेही पदविका प्रमाणपत्र आढळून आले नाही.
या प्रकरणी वरिष्ठांशी संपर्क साधून अधिक चौकशी करून कारवाई करणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल मुंडे यांनी सांगितले. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा प्रतिसाद मिळू शकला नाही.दरम्यान, ग्रामीण भागात अशा बोगस शिबिरांमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
