केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडून १०० ट्रक जीवनावश्यक साहित्याची मदत

गौतम बचुटे/केज: यंदा पावसाने दगा दिल्याने बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरण्या केल्या, मात्र उत्पादन हाती न आल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. तर शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त कुटुंबांची अन्न-पाण्यावाचून होणारी आबाळ रोखण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले हे धावून आले आहेत.रिपाइंचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. एस. नंदा आणि युवक प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या विशेष प्रयत्नातून राज्यासाठी जीवनावश्यक किराणा साहित्याचे तब्बल १०० ट्रक पाठवण्यात आले आहेत. या साहित्याचे वाटप जिल्हाभरात सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून केज तालुक्यातील होळ येथे शनिवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी तालुकाध्यक्ष दीपक भाऊ कांबळे यांच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या वितरण सोहळ्यास राजपाल भैय्या काकडे (तालुकाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा), धनराज लाटे (भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य, होळ), राहूल खोडसे (जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड), सरपंच शिवराज काळदाते, युवा उद्योजक संघा धनेगावकर, सुनिल लोमटे, दिलीप बनसोडे, तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, सुरज काळे, प्रशांत हजारे, रोहित कांबळे, शोएब शेख यांच्यासह रिपाइं, भाजपा आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.होळ सर्कलमधील शेतकरी, शेतमजूर, अनाथ, गरीब, विधवा, अपंग अशा शेकडो गरजू कुटुंबांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. हातात जीवनावश्यक वस्तूंचे किट मिळताच अनेक वृद्ध आणि निराधारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येणार आहे.

शेतमजुरांनाही मदत द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू

“शासनाने शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी भरीव मदत तर द्यावीच, परंतु शेतात राबणाऱ्या शेतमजूर कुटुंबांनाही आर्थिक मदत द्यावी. जर शेतमजुरांना वाऱ्यावर सोडले, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.” – दीपक कांबळे (रिपाइं तालुकाध्यक्ष, केज)

दीपक कांबळे

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...