विश्वजीत गंडले/घाटनांदूर : अंबाजोगाई – अहमदपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 D वर अपघातांचे सत्र काही केल्या थांबेना. घाटनांदूर येथील प्रसिद्ध लक्ष्मेश्वर महादेव मंदिराजवळ शनिवारी (दि. 31) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात तळणी येथील एका ३६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तळणी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तळणी येथील रहिवासी शाम मोहन गित्ते (वय ३६ वर्षे) हे आपली मोटारसायकल क्रमांक MH 44 L 5841 वरून तळणीकडे जात होते. ते घाटनांदूरच्या लक्ष्मेश्वर मंदिराच्या अलीकडे आले असता, समोरून येणाऱ्या एका अनोळखी भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, शाम गित्ते हे रक्ताच्या थारोळ्यात जागीच गतप्राण झाले तर त्यांची दुचाकीही चक्काचूर झाली.अपघाताची माहिती मिळताच घाटनांदूरच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, अपघातानंतर अनोळखी वाहनाचा चालक आपले वाहन घेऊन अंधाराचा फायदा घेत पसार झाला.
घटनास्थळी महत्त्वाचा पुरावा

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, तेथे MH 44 U 4827 या क्रमांकाची एक नंबरप्लेट पडलेली आढळून आली. ही नंबरप्लेट अपघात करून पळून गेलेल्या वाहनाचीच असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या नंबरप्लेटच्या आधारे आरोपी वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
कुटुंबाचा आधार हरपला
शाम गित्ते हे अत्यंत मनमिळावू आणि कष्टाळू तरुण म्हणून तळणी परिसरात परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने गित्ते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत शाम गित्ते यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिस तपास सुरू
या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत असून, आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. तसेच, या महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वेग नियंत्रक आणि गतिरोधक बसवण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

