गौतम बचुटे/केज: केज तालुक्यातील येवता येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची फेर निवड आणि आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांच्यासह पंचायत समिती केज, बीड शहर पोलीस ठाणे आणि जि.प. शिक्षण विभाग बीड यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, शाळेच्या मुख्याध्यापकांनी मनमानी धोरण राबवून शासनाच्या आदेशाचे पालन न करता बेकायदेशीर शालेय व्यवस्थापन समितीची निवड केली आहे. शासनाच्या आदेशानुसार SC, ST, OBC प्रवर्गाला आणि महिलांना 50% प्राधान्य देणे बंधनकारक असताना, महिलांच्या खोट्या सह्या करून बोगस समितीची निवड करण्यात आली आहे.तसेच दि. 12 डिसेंबर 2025 रोजी निलंबित झालेले मुख्याध्यापक बी.बी. शिंदे यांच्याशी संगनमत करून शालेय खात्यातून 55 हजार रुपये पगार म्हणून देण्यात आले असून आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला आहे. ऊसतोड कामगार हंगामी वसतिगृहात 102 मुलांची बोगस यादी तयार करून लाखो रुपयांची बिले उचलण्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
विद्यार्थी परीक्षेपासून वंचीत
दि. 11 ऑक्टोबर रोजी NASA-ISRO विज्ञान संशोधन कार्यक्रमासाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीसाठी शाळेतील एकाही विद्यार्थ्याचा फॉर्म न भरता विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभापासून वंचित ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे.या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी दि. 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
