अंबाजोगाई/प्रतिनिधी: अंबाजोगाई शहरात वाहन चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून, भरदिवसा बसस्थानकासमोरील वर्दळीच्या ठिकाणाहून दुचाकी चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. बस डेपो समोरील मांडवा रोडवरील एका अभ्यासिकेसमोर लावलेली ३० हजार रुपये किमतीची स्कुटी अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भीमराव पिराजी मुंडे (वय ५३, व्यवसाय – वाहतूक नियंत्रक, एसटी महामंडळ, अंबाजोगाई आगार, रा. अंबाजोगाई) यांची काळ्या रंगाची Aviator कंपनीची स्कुटी (क्र. MH-44-N-6529) त्यांनी दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता बस डेपो समोरील मांडवा रोडवर असलेल्या Excellent अभ्यासिकेसमोर झाडाखाली लावली होती.विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या या ठिकाणी लावलेली गाडी रात्री ८ वाजेपर्यंत त्याच ठिकाणी होती. मात्र त्यानंतर अज्ञात चोरट्याने संधीचा फायदा घेत हातोहात स्कुटी चोरून नेली.

बराच वेळ शोध घेऊनही गाडी न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलिसात धाव घेतली.पोलिसात गुन्हा दाखल, तपास सुरू या प्रकरणी फिर्याद दिल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलिसांनी दि. ३० ऑक्टोबर रोजी रात्री ७ वाजता अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गाडे हे करीत आहेत.

शहरात वाहन चोरी वाढली

दरम्यान, अंबाजोगाई शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बसस्थानक, अभ्यासिका आणि बाजारपेठेतील गर्दीच्या ठिकाणाहून गाड्या चोरीला जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...