अंबाजोगाई/प्रतिनिधी: दिवाळीचा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद घेऊन येतो. समाजातील गरजू व उपेक्षित घटकांनाही या आनंदात सहभागी करून घेण्याच्या उदात्त हेतूने सिनर्जी नॅशनल स्कूल, अंबाजोगाई तर्फे ‘दिवाळीचा प्रकाश, प्रत्येक घरासाठी’ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तांदूळ, साखर, खाद्यतेल, हरभरा डाळ, रवा, बेसन तसेच गहू व गव्हाचे पीठ अशा जीवनावश्यक वस्तूंचे संकलन केले. या वस्तूंपासून तयार करण्यात आलेल्या ३० किराणा किटचे समाजातील उपेक्षित ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले. हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष संदिपान रेड्डी, सचिव रमाकांत माने, संचालक नाथ रेड्डी, डॉ. अनिल भुतडा आणि डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी शाळेच्या प्राचार्य भाविका शाह, मानवलोक संस्थेचे प्रतिनिधी, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी

विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याने त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी, सहकार्य आणि सेवाभाव या मूल्यांची रुजवण झाली. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये माणुसकी आणि सामाजिक जाणीव विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.’आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेणे, हाच खऱ्या दिवाळीचा प्रकाश!’ हा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला. सिनर्जी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...