अंबाजोगाई (प्रतिनिधी) – शहरात झालेल्या अतिक्रमण हटाव कारवाईचा सर्वाधिक फटका शिकलकरी वस्तीतील गरीब कुटुंबांना बसला आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या कारवाईमुळे अनेकांचा संसार अक्षरशः रस्त्यावर आला असताना या संकटात अंबाजोगाईच्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेने माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
शहरातील रस्ता रुंदीकरणासाठी प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत शिकलकरी वस्तीतील अनेक घरांवर कारवाई झाली. हातावरचे पोट असलेल्या या कुटुंबांसमोर अचानक निवाऱ्यासह अन्नाचा प्रश्न निर्माण झाला होता.या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत ज्ञानप्रबोधिनीचे प्रसाद दादा यांनी तातडीने पुढाकार घेतला. ज्ञानप्रबोधिनीचे प्रसाद दादा यांच्या पुढाकारातून रविवार (दि. 01) विस्थापित झालेल्या कुटुंबांना तातडीची मदत देण्यात आली. प्रशासन आपले कर्तव्य करत असताना समाजातील गरजू घटकांच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी पुढे येणाऱ्या अशा सामाजिक संस्थांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.या मदत वाटप प्रसंगी प्रसाद दादा यांच्यासह नगरसेवक महेश लोमटे, रत्नाकर निकम सर, सदानंद वालेकर यांच्यासह वस्तीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन
या मदतीअंतर्गत या कुटुंबांना तांदूळ, मसूर डाळ, गव्हाचे पीठ आणि तेल अशा जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.अचानक आलेल्या या संकटामुळे या कुटुंबांसमोर अन्नाचा प्रश्न गंभीर बनला होता. अशा वेळी मिळालेल्या या मदतीमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केवळ अन्नधान्यच नव्हे तर तुमच्या पाठीशी आम्ही आहोत हा विश्वास देण्याचे काम ज्ञानप्रबोधिनीने केले आहे.
