अंबाजोगाई/प्रतिनिधी: अंबाजोगाई शहरात 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपरिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने 1 नोव्हेंबर रोजी अधिकृत प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे.
या कारवाईवरून शहरात सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955, महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 तसेच शासनाच्या 5 ऑगस्ट 2019 च्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. शहरातील रस्त्यांच्या हद्दीबाबत मंजूर विकास आराखडा आणि बांधकाम परवानग्यांच्या अधीन राहून कायदेशीर प्रक्रियेनुसार अतिक्रमणे काढण्यात आल्याचा दावा विभागाने केला आहे.दरम्यान, या मोहिमेबाबत समाजमाध्यमांवर चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन विभागाने केले आहे.
रस्ते सुरक्षा आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचे सांगत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता गो.प्र.स्वामी यांनी केले आहे.
