गौतम बचुटे/केज:- केज पंचायत समितीच्या आवारात उभारलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. स्मारकाभोवती घाण साचली असून, पान-तंबाखू खाऊन थुंकल्याने आणि जुगारी-मटक्याच्या अड्ड्यामुळे या पवित्र स्मारकाची अवहेलना होत आहे. याबाबत पंचायत समिती प्रशासनाला अनेक वेळा कळवूनही कारवाई होत नसल्याने अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः हातात झाडू घेत परिसर स्वच्छ करून स्मारकाला दुग्धाभिषेक घातला.

केज, सफाई

केज तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रज आणि निजाम राजवटीविरुद्ध लढा देऊन स्वातंत्र्य संग्रामात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची आठवण चिरकाल राहावी म्हणून केज पंचायत समितीच्या आवारात हे स्मारक उभारण्यात आले आहे.या स्मारकाच्या कोनशिलेवर स्वातंत्र्य संग्रामातील किसन सदाशिव पाटील (मांगवडगांव), दगडू केशव महानुभाव (विडा), मणिक केशवराव पटाईत (विडा), शिवाजी देवराव पटाईत (विडा), धोंडीराम पांडुरंग कावळे (बनसारोळा), विठ्ठल गोविंद देशपांडे (केज), निवृत्ती फकीरराव ढाकणे (सारोळा), मुरलीधर विश्वनाथ सोनार (विडा), नागनाथ अंबादास खिंडरे (धारूर), काशिनाथ रामकृष्ण (धारूर) या वीरांची नावे कोरलेली आहेत. तर मागील बाजूस भारतीय राज्यघटनेची उद्देशिका कोरलेली आहे.

तक्रार करूनही दुर्लक्ष

या स्मारकाला संरक्षक कठडा किंवा जाळी नसल्याने त्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे. पंचायत समितीत कामासाठी येणारे नागरिक आणि जुगार-मटका खेळणारे या परिसरात थुंकत असल्याने प्रचंड केर-कचरा जमा झाला आहे.सामाजिक कार्यकर्ते तात्या गवळी यांनी गटविकास अधिकारी आणि बांधकाम विभागाकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दि. २ नोव्हेंबर रोजी तात्या गवळी आणि रोहन बचुटे यांनी हातात झाडू घेऊन संपूर्ण परिसराची साफसफाई केली. स्मारक पाण्याने धुवून त्यावर दुग्धाभिषेक केला आणि पुष्पहार अर्पण करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत अनोखे आंदोलन केले.

लोकवर्गणीतून उभारणार कठडा

शासनाने तात्काळ कारवाई करून ही अवहेलना थांबवली नाही, तर लोकवर्गणी गोळा करून बांधकाम विभागाची परवानगी घेऊन स्मारकाभोवती लोखंडी कठडा उभारणार असल्याचा इशारा तात्या गवळी यांनी दिला आहे.स्मारकाच्या दुर्दशेला जबाबदार कोण? :- स्वातंत्र्य सैनिकाच्या स्मारकाची अवहेलना करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...