अंबाजोगाई : बीड जिल्ह्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी नियुक्ती नुकतीच जाहीर झाली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाच्या रेल्वे प्रवासी सल्लागार समितीमध्ये अंबाजोगाईचे अमर दगडूसाहेब देशमुख यांना स्थान मिळाले आहे.
रेल्वे मुख्यालयाकडून 30 सप्टेंबर 2026 रोजी निर्गमित झालेल्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे. 2026 पासून ते ऑगस्ट 2028 पर्यंत ते या समितीवर सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती, त्या शिफारसीनुसारच ही निवड झाली असल्याची माहिती आहे. अमर देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष आहेत.
अभिनंदनाचा वर्षाव
ही बातमी समजताच राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजेसाहेब देशमुख, संजय भोसले, ॲङ इस्माईल गवळी, मदन परदेशी, अंकुश हेडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.डीआरयूसीसी ही समिती प्रवासी आणि रेल्वे प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करते. प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, स्थानकांवरील सुविधांची कमतरता आणि नवीन मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम या समितीमार्फत केले जाते. त्यामुळे केवळ पदावर न थांबता प्रत्यक्ष काम करावे, अशी अपेक्षा नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
या संधीबद्दल प्रतिक्रिया देताना अमर देशमुख म्हणाले की, खासदारांनी जो विश्वास दाखवला आहे त्याला पात्र राहण्याचा प्रयत्न करेन. बीड जिल्ह्याच्या रेल्वे प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. स्थानकांवरील स्वच्छता, पाणी, बसण्याची व्यवस्था, महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी असलेल्या सुविधा, गाड्यांना थांबा मिळवणे आणि नवीन गाड्या सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

