डी. सदानंद/अंबाजोगाई: ग्रामीण भागातील शिक्षण म्हटले की अनेक अडचणी डोळ्यासमोर येतात, मात्र या सर्व धारणांना छेद देत अंबाजोगाई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सोनवळा येथे शिक्षण क्षेत्रात एक प्रेरणादायी परिवर्तन घडत आहे.

शाळेच्या या परिवर्तनात अनेक उपक्रमांचा समावेश आहे. एका दानशूर व्यक्तीच्या मदतीतून शाळेत सुसज्ज वाचनालय उभे राहत आहे. आकर्षक फर्निचर, सुंदर सजावट आणि वाचनासाठी प्रसन्न वातावरण असलेले हे वाचनालय ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवे दालन ठरत आहे. ग्रामीण मराठवाड्यातील हा पहिलाच अशा प्रकारचा उपक्रम असल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण परिवर्तनाच्या वाटचालीत कदम सर, मनोज देशमुख, श्रीधर देशपांडे, बिडवे सर, मुख्याध्यापक तसेच इतर सर्व शिक्षक मंडळी विशेष कौतुकाचे मानकरी आहेत.ग्रामीण भागातील शाळांमध्ये असा सकारात्मक बदल घडवून आणणे ही निश्चितच अभिमानाची बाब असून हा उपक्रम इतर सर्व शाळांसाठी आदर्श ठरावा असाच आहे.

वाचनालयापुरते मर्यादित नाही

या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे येथील उपक्रम केवळ एका गोष्टीपुरते मर्यादित नाहीत. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष जीवनातील ज्ञान मिळावे यासाठी शाळेत सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात.

निसर्ग सहल व शिष्यवृत्ती परीक्षा

विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात नेऊन पक्ष्यांचा अभ्यास, त्यांच्या सवयी, निसर्गाचे महत्त्व समजावून सांगितले जाते. ग्रामीण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मागे राहू नयेत यासाठी विशेष शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग घेतले जातात.

मार्केट व व्यवहार ज्ञान

विद्यार्थ्यांना बाजारपेठ, पैशांचे व्यवहार आणि व्यावहारिक ज्ञान याची माहिती दिली जाते, जेणेकरून ते व्यवहार चतुर होतील.ज्ञान, विज्ञान आणि वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या या शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

D. Sadanand is a new rural correspondent from Ambajogai taluka, Beed district. He recently joined Beed News Express to cover rural areas of Ambajogai, focusing on village news, local events, and social...