छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 18 वर्षांनंतर पराभवाचा धक्का बसल्यानंतर माजी आमदार सतीश चव्हाण यांनी अखेर आपली मौन सोडत पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एक भावनिक पत्र पोस्ट करत मतदारांचे आभार मानले आहेत.
सतीश चव्हाण यांनी पत्रात लिहिले आहे की, “निवडणूक म्हणजे लोकमताचा निर्णय. गेली अठरा वर्षे मी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रतिनिधित्व केले. या काळात माझ्याकडून जे जे करता येईल ते ते मी केले. मात्र लोकांचा निर्णय हा लोकशाहीत अंतिम असतो आणि तो मान्य करीत आपले लोककार्य पुढे चालू ठेवायचंच हा माझा निश्चय आहे.”
प्रतापसिंह पाटील यांना शुभेच्छा
विजयी उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे अभिनंदन केले आहे. “मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून विजयी झालेले श्री. प्रतापसिंह पाटील यांना माझ्याकडून विजयाच्या शुभेच्छा.” असे त्यांनी म्हटले आहे.
अजितदादांच्या शिकवणीचा उल्लेख
“या अठरा वर्षांच्या कालखंडात माझ्याकडून काही राहून गेले असल्यास आपण समजून घ्याल ही अपेक्षा बाळगतो,” असे म्हणत त्यांनी मतदारांची माफीही मागितली आहे.शेवटी त्यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या शिकवणीची आठवण काढली. “पराभवाने खचायचं नाही आणि विजयाने मातायचं नाही, पुन्हा नव्या दमाने उभं राहायचं – ही स्वर्गीय अजितदादांची शिकवण लक्षात ठेवून, यापुढेही मराठवाड्यातील जनता आणि कार्यकर्त्यांच्या सोबतीने लोककार्यात कार्यरत राहीन.”
निकाल काय लागला होता?
या निवडणुकीत महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी शरद पवार गट) डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा सुमारे साडेअठरा हजार मतांनी पराभव केला होता. 27 ऑक्टोबरला सुरू झालेली मतमोजणी 40 तास चालून 29 ऑक्टोबरला संपली होती.
MLC Satish Chavan Official
