शेतमजुरांची उपासमार रोखण्यासाठी रिपाइंच्या शिष्टमंडळाची मागणी

गौतम बचुटे/केज :- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतमजूर आणि सुशिक्षित बेरोजगारांची उपासमार रोखण्यासाठी तसेच मजुरांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.

दि. ३ नोव्हेंबर रोजी रिपाइं (आठवले गट) चे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ केज तहसील कार्यालयात दाखल झाले. यावेळी सरचिटणीस गौतम बचुटे, ज्येष्ठ नेते दिलीप बनसोडे, उपाध्यक्ष प्रशांत हजारे, शरद धिवार, विनोद शिंदे यांच्यासह होळ आणि परिसरातील शेतमजूर महिला व सुशिक्षित बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिष्टमंडळाने तहसीलदार अशोक भंडारे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

निवेदनातील मागण्या

१. स्वस्त धान्य योजनेद्वारे दिले जाणारे अन्नधान्य उत्तम दर्जाचे देण्यात यावे.
२. शेतमजूर व सर्वसामान्य मजुरांना दरमहा ५ हजार रुपयांचे अनुदान द्यावे.
३. सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा १० हजार रुपये बेरोजगारी भत्ता व अनुदान द्यावे.
४. बेरोजगारांच्या हाताला तातडीने काम उपलब्ध करून द्यावे.दुष्काळात शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...