गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील बनसारोळा ग्रामपंचायतीमधील शासकीय निधीच्या कथित अपहार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.तक्रारदार आणि ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा अजय काळे यांनी अॅड. हनुमंत जाधव यांच्या मार्फत ही याचिका (Criminal Writ Petition No. 1025/2026) दाखल केली आहे. या याचिकेवर दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सुनावणी झाली.
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन सरपंच सौ. नीता बाळासाहेब धायगुडे आणि तत्कालीन ग्रामसेवक मधुकर माने यांनी सन २०१९ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ग्रामपंचायतीला शासनाकडून आलेल्या विविध योजनांच्या निधीमध्ये मोठा गैरव्यवहार केला आहे.विकासकामे प्रत्यक्षात न करताच कागदोपत्री खोटी बिले तयार करण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीचे नोंदणीकृत कंत्राटदार नसताना, निधी थेट सरपंच-ग्रामसेवकांच्या नातेवाईकांच्या व गावातील काही संबंधित व्यक्तींच्या वैयक्तिक बँक खात्यांवर वर्ग करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे.बँक स्टेटमेंट आणि इतर कागदपत्रांवरून सुमारे १ कोटी ८ लाख रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
ग्रामसभेची मान्यता न घेताच निधी वितरण
ग्रामपंचायत अधिनियमानुसार कोणताही शासकीय निधी खर्च करताना मासिक सभा आणि ग्रामसभेचा ठराव बंधनकारक आहे. मात्र, या कालावधीत अनेक खर्चांना ग्रामसभेची किंवा मासिक सभेची मान्यता घेतलीच नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
तक्रार करूनही गुन्हा नाही म्हणून न्यायालयात धाव
या संदर्भात सुवर्णा काळे यांनी दि. २२ एप्रिल २०२६ रोजी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. तसेच बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही तक्रार केली होती. मात्र अपेक्षित कारवाई न झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाचे आदेश
या प्रकरणाची सुनावणी न्या. संदीपकुमार सी. मोरे आणि न्या. वैशाली पाटील-जाधव यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी सरकारी पक्षातर्फे युसूफवडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवलेला चौकशीबाबतचा पत्रव्यवहार न्यायालयासमोर सादर करण्यात आला.
हा पत्रव्यवहार नोंदवून घेत न्यायालयाने हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी दि. २ डिसेंबर २०२६ रोजी ठेवले आहे.शासकीय निधी हा जनतेच्या विकासासाठी असतो, त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा याचिकाकर्त्या सुवर्णा काळे यांनी व्यक्त केली आहे.याचिकाकर्त्यांतर्फे ॲङ हनुमंत पी. जाधव यांनी न्यायालयात बाजू मांडली.
