गौतम बचुटे/केज:-
जुन्या भांडणाच्या कारणातून केज तालुक्यातील कोरेगाव येथे एका व्यक्तीला कत्ती, काठी आणि वायरने जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरुद्ध जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास कोरेगाव येथील वैतागवाडी वस्तीवर घडली. फिर्यादी प्रवीण पांडुरंग तांदळे हे त्यांच्या घरासमोर थांबलेले असताना आरोपी गोकुळ मधुकर तांदळे, बाळासाहेब मधुकर तांदळे, सुशांत उर्फ सोन्या देविदास तांदळे, देविदास ज्ञानोबा तांदळे आणि शुभम अंकुश तांदळे (सर्व रा. कोरेगाव) यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवली.
जुन्या वादातून त्यांनी प्रवीण तांदळे यांना शिवीगाळ करत काठ्या, वायर आणि लोखंडी कत्तीने बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीचा चुलत भाऊ अतुल तांदळे हा मध्ये गेला असता, आरोपींनी त्याच्याही हातावर कत्तीने वार करून त्याला जखमी केले.
या घटनेनंतर जखमींवर उपचार करण्यात आले असून प्रवीण तांदळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६९१/२०२६ नुसार भा.न्या.सं. १०९(१), १८९(२), १९०, १९१(३), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर हे पुढील तपास करीत आहेत.
