दोन-दोन किलोमीटर पर्यंत रांगा, नागरिकांत संताप
विश्वजीत गंडले/घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील महत्त्वाचे गाव असलेल्या घाटनांदूर येथे रेल्वे ट्रॅकवरील उड्डाणपूल अनेक दिवसांपासून रखडल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या ठिकाणी मुख्य रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी रेल्वे फाटकावर उड्डाणपूल नसल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
रेल्वे वाहतूक वाढल्याने दिवसातून 5 ते 7 वेळा रेल्वे फाटक बंद करावे लागते. फाटक बंद होताच दोन्ही बाजूंना दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. सकाळी शाळा-कॉलेज, कार्यालय आणि दवाखान्यात जाणाऱ्या नागरिकांना तासन् तास खोळंबून राहावे लागते. रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाही या कोंडीचा मोठा फटका बसत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन उड्डाणपुलाचे काम मार्गी लावावे, अशी जोरदार मागणी घाटनांदूर परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
घाटनांदूर येथील हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. हा रस्ता एका बाजूने नांदेड – अहमदपूर – उदगीर – नागपूर या महत्त्वाच्या शहरांना जोडतो, तर दुसऱ्या बाजूने अंबाजोगाई – लातूर – छत्रपती संभाजीनगर – पुणे या मार्गाला जोडणारा मुख्य दुवा आहे. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. एस.टी. महामंडळाच्या बसेस, खासगी लक्झरी बसेस, ट्रक, ट्रॅव्हल्स आणि शेकडो दुचाकी-चारचाकी वाहनांची येथून सतत ये-जा सुरू असते.
रेल्वे ट्रॅक परिसरातील रस्ता अत्यंत खराब
घाटनांदूर येथील रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंचा सुमारे 200 मीटरचा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे. भविष्यात येथे उड्डाणपूल होणार असल्याच्या कारणास्तव या पट्ट्यातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून मुरूम उखडला आहे. दुचाकीधारकांना या खड्ड्यांमधून जाताना जीव मुठीत धरून कसरत करावी लागत आहे. लहान वाहने खड्ड्यांत आदळून त्यांचे नुकसान होत आहे.
घाटनांदूर ते अंबाजोगाई रेल्वे : स्वप्न हवेतच!
अंबाजोगाई हे मराठवाड्यातील महत्त्वाचे शैक्षणिक, व्यापारी आणि तीर्थक्षेत्र आहे. घाटनांदूरपासून अंबाजोगाई हे अंतर अगदी जवळचे असूनही आजतागायत घाटनांदूर ते अंबाजोगाई थेट रेल्वेमार्ग होऊ शकलेला नाही, ही मोठी शोकांतिका आहे. अनेक वर्षांपासून या रेल्वेमार्गाची मागणी घाटनांदूर-अंबाजोगाई परिसरातील नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थी वर्गाकडून होत आहे. निवडणूक आली की राज्यकर्ते या रेल्वेचे गाजर दाखवतात, भव्य आश्वासनांचा पाऊस पाडतात. मात्र निवडणूक संपली की ही आश्वासने हवेत विरून जातात. आजपर्यंत जनतेला आश्वासनांव्यतिरिक्त काहीच मिळालेले नाही. जर घाटनांदूर ते अंबाजोगाई रेल्वेमार्ग झाला तर नांदेड-नागपूरकडून येणाऱ्या प्रवाशांना थेट अंबाजोगाईला येता येईल, व्यापार वाढेल आणि दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटेल.





