अंबाजोगाई /बीएन वृत्तसेवा:
स्वर्गीय बाबुराव आडसकर यांनी आपल्या संपूर्ण हयातीत सत्तेपेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व दिले, त्यांच्याच विचारांचा वारसा पुढे चालवणार असल्याचे प्रतिपादन रमेश आडसकर यांनी केले. केज तालुक्यातील आडस येथे मंगळवारी (दि. १०) दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी साडेदहा वाजता आयोजित स्नेह मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी स्वर्गीय आडसकरांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी सांगितले की, स्वर्गीय बाबुराव आडसकर यांनी कधीही जात-पात पाहिली नाही. सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवणे, गोरगरिबांच्या न्याय-हक्कासाठी लढा देणे हाच त्यांचा खरा वारसा होता. त्यांनी दाखवलेल्या आपुलकी, प्रेम आणि सामाजिक बांधिलकीच्या वाटेवरच पुढे चालत सामान्य जनतेची निस्वार्थ सेवा करण्यास कटिबद्ध असल्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून समाजसेवेचे माध्यम असल्याचे मतही त्यांनी मांडले.यावेळी केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्थानिक राजकारणावरून टोला

आजकाल राजकारणात केवळ तिकीट आणि आमदारकीसाठी जुळवाजुळव केली जाते. पण निवडणुका, तिकीट, आमदारकी ही येणारी-जाणारी आहे. आजचा विजयी पुढारी उद्या पराभूत होऊ शकतो. त्यामुळे तात्पुरत्या स्वार्थापेक्षा लोकांच्या सुख-दुःखात उभे राहणे, गटतट विसरून समाजकारण करणे हेच खरे राजकारण असल्याचा टोला रमेश आडसकर यांनी यावेळी लगावला.

पदवीधर निवडणुकीवर मार्मिक भाष्य

पदवीधर निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना रमेश आडसकर म्हणाले, “सतीशभाऊ चव्हाण पडतील असं वाटतच नव्हतं. पण आज रानातला गरीब माणूसही विचारतोय – १८ वर्षात पदवीधरांसाठी काय केलं? पदवीधरांच्या प्रश्नांपेक्षा इतरच गोष्टींमध्ये जास्त रस घेतला गेला.” त्यांच्या या मार्मिक टिप्पणीवर उपस्थित नागरिकांमध्ये एकच हशा पिकला.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...