अंबाजोगाई/ प्रतिनिधी: महिलांनी शेतीतील योगदानासोबतच शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधावे, असे आवाहन दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाईचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांनी केले.
दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई आणि आत्मा, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने डिघोळआंबा येथे राष्ट्रीय महिला शेतकरी दिनानिमित्त महिला शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. देशमुख होते, तर उद्घाटक म्हणून आत्मा, बीडचे प्रकल्प उपसंचालक सुरज पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर सेवानिवृत्त उपसंचालक जाधवर, डॉ. रमा पांडे आणि डॉ. स्वाती अर्धापूरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा कर्डिले यांनी केले, तर आभार डॉ. रवींद्र कोरके यांनी मानले.
शेतीपूरक व्यवसायातून उद्योजक व्हा
डॉ. रमा पांडे यांनी ऊस उत्पादक महिलांनी रसवंती, फळबागधारकांनी फळप्रक्रिया, तर पशुपालन करणाऱ्या महिलांनी दुग्धजन्य पदार्थांचे व्यवसाय सुरू करावेत, असे सांगितले.आत्माचे सुरज पाटील यांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली आणि महिलांनी आळिंबी उत्पादनासारख्या व्यवसायाचा विचार करावा, असे आवाहन केले.
यशस्वी उद्योजिकांचा सन्मान
यावेळी दौनापूरच्या कल्याणी मिटकरी, कोल्हेवाडीच्या शीला कुरवडे, युसुफवडगावच्या स्वाती लामतुरे व दीपाली बेंद्रे, तसेच नंदागौळच्या धनश्री गीते या यशस्वी उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला.

