गौतम बचुटे/केज: – अंबाजोगाई तालुक्यातील अंजनपूर येथे घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाईट आल्यानंतर शेतात गेलेल्या कुटुंबाच्या घरात घुसून, तीन अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंजनपूर येथील लक्ष्मण तोकले आणि त्यांचा मुलगा विजय तोकले हे दोघे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लाईट आल्याने शेतात मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. घरी त्यांची पत्नी आणि सून या दोघी घरात असल्याने घराला बाहेरून कुलूप लावून गेले होते. दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरात महिला एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेत तीन अज्ञात भामट्यांनी घरात प्रवेश केला.चोरट्यांनी धाक दाखवून महिलेच्या हातातील सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली आणि कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मण तोकले यांच्या फिर्यादीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २८४/२०२६ नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार मोरे करत आहेत.

लांबवलेला मुद्देमाल

सोन्याची अंगठी (८ ग्रॅम) – ३२,००० रु.सोन्याचे झुंबर (४ ग्रॅम) – १६,००० रु.चांदीची चैन व जोडवे – २,००० रु.रोख रक्कम – ५,००० रु.एकूण ५५,००० रुपयांचा ऐवज. चोरटे चोरी करीत असताना घरातील महिलांनी पाहिले आणि त्या भीतीने मोठ्याने ओरडताच चोरटे पळून गेले. त्यांनी तिघांनीही तोंडाला मास्क लावलेले होते आणि ते तिघेही २० ते २५ वर्ष वयोगटातील होते.

श्वान पथक दाखल

अंजनपूर येथील घरफोडीच्या घटनेच्या तपासासाठी बीड येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाची गाडी गावात येताच नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.श्वान पथकातील प्रशिक्षित श्वानाने घरात आणि घराबाहेर पूर्ण परिसराची झडती घेतली. चोरट्यांनी पळ काढलेल्या दिशेने माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...