अंबाजोगाई/प्रतिनिधी: अंबाजोगाई शहरातील रायगडनगर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य एचडीपीई जलवाहिनीची अज्ञात कारणातून तोडफोड करण्यात आल्याने परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.
नगरपरिषदेचे पाणी पुरवठा निरीक्षक दत्तात्रय सावंत हे १३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता ड्युटीवर असताना कर्मचारी दिगंबर यादव यांनी ही माहिती दिली. राम टिंगरे यांच्या घरासमोरील पाईपलाईनची पाहणी केली असता ती कापल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी चौकशीअंती राम टिंगरे, गणेश पोपडे, बालाजी नरसिंगे आणि संतोष पवार या चौघांनी मिळून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचे समोर आले. सावंत यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोहेकॉ गुट्टे तपास करीत आहेत.
