अंबाजोगाई /प्रतिनिधी: अंबाजोगाई तालुक्यात मौल्यवान चंदनाच्या झाडांची चोरी (Theft) करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, आकोला येथे चंदन चोरीचा प्रयत्न स्थानिक शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील आकोला येथील शेतकरी मधुकर पांडुरंग आगळे यांच्या मालकीच्या गट नंबर १८६ मधील शेतात ही घटना घडली. दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शेतात लावलेले चंदनाचे झाड तोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.आरोपी (Accused) राम अंकुश गायकवाड (वय २७, रा. तांदुळजा, ता. जि. लातूर) हा चंदनाचा गाभा घेऊन जात असताना शेतकऱ्यांनी त्यास रंगेहात पकडले. त्यानंतर त्यास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
विक्रीचा प्लॅन फसला
पोलिसांनी चौकशी केली असता, आरोपीने चोरी केलेला चंदनाचा गाभा हा मुरुड येथील राजू गायकवाड (रा. मुरुड, ता. जि. लातूर) यास विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दुसऱ्या आरोपीसही या गुन्ह्यात सहआरोपी केले आहे.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी पोलीस अंमलदार बाबूराव माणिकराव घुगे (नेमणूक – पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास (Investigation) पोलीस करत आहेत.दरम्यान, चंदन हे अतिशय मौल्यवान वृक्ष असून त्याच्या तोडीसाठी वन विभागाची परवानगी लागते. विनापरवाना चंदनाची तोड व विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील चंदनाच्या झाडांची नोंद वन विभागाकडे करावी आणि संशयित व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन केले आहे.
