अंबाजोगाई: केज विधानसभा मतदारसंघाच्या आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह, बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात एका व्यक्ती विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन कुलकर्णी (रा. अंबाजोगाई) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने दि. १० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास फेसबुकवर आ. मुंदडा यांच्या विरोधात पोस्ट केली होती. या प्रकरणी भाजपचे अंबाजोगाई शहर मंडळ अध्यक्ष संजय शहाजी गंभीरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले आहे की, सदर पोस्टमध्ये नगर परिषदेच्या नेमणुकांवरून अपमानास्पद वक्तव्य, भाजप सरकारकडून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचा निराधार आरोप आणि शहरातील अवैध धंद्यांशी संबंध जोडून आमदारांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात NCR क्र. 0438/2026 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करत आहेत.
