२३ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांवर गुन्हे
गौतम बचुटे/केज: तालुक्यात अवैध दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. युसुफवडगाव आणि केज पोलिसांनी चार ठिकाणी छापे टाकून २३ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
युसुफवडगाव ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या पथकाने दि. १० सप्टेंबर रोजी ही कारवाई केली.
कारवाईचा तपशील:
1. माळेगाव चौक: चोरटी दारू वाहतूक करणारी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ (MH 44 / AE 5031) अडवली. त्यात १२ हजार रुपयांची रॉयल स्टॅग विदेशी दारू आढळली. बप्पाजी बिक्कड (रा. नाव्होली) याला ताब्यात घेतले.
2. बनसारोळा: हनुमान मंदिराजवळ अवैध दारू विक्री करणारा सुधाकर दत्तू जोगदंड याच्याकडून १३ हजार रुपयांचे मद्य जप्त.
3. धनेगाव फाटा: २२०० रुपयांची दारू आणि ५५ हजार रुपयांची मोटारसायकल जप्त. धम्मदीप जोगदंड आणि समाधान वैरागे यांच्यावर कारवाई.
4. केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या आदेशाने वरपगाव येथे बन्सी पवार याच्यावर गावठी दारू प्रकरणी कारवाई करण्यात आली.
एकूण २८ हजार रुपयांची देशी-विदेशी दारू, एक स्कॉर्पिओ आणि एक मोटारसायकल असा एकूण २३ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
