अंबाजोगाई – यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा स्व. भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यंदा ज्येष्ठ कवी व साहित्यिक प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.

या पुरस्काराचे हे १४ वे वर्ष आहे. राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती, संगीत, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवराला हा पुरस्कार दिला जातो.

डॉ. विठ्ठल वाघ हे मराठी साहित्यातील मातीचा सुगंध जपणारे कवी म्हणून परिचित आहेत. ‘काया मातीत मातीत’, ‘कपाशीची चंद्रफुले’, ‘पाऊसपाणी’, ‘गावशिव’ असे त्यांचे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. डेबू कादंबरी, चित्रपट गीत लेखन आणि पहाडी आवाजातील कविता सादरीकरण यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म हिंगणी, ता. तेल्हारा, जि. अकोला येथील असून सध्या ते पुण्यात वास्तव्यास आहेत.

पुरस्कार वितरण सोहळा

हा पुरस्कार रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आद्यकवी मुकुंदराज सभागृह, अंबाजोगाई येथे प्रदान करण्यात येणार आहे. प्रख्यात साहित्यिक व गांधीवादी विचारवंत प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पहार आणि रोख २५ हजार रुपये असे आहे.

या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष डॉ. कमलाकर कांबळे, प्रा. सुधीर वैद्य व सर्व सदस्यांनी केले आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *