गौतम बचुटे/केज:- केज-कळंब मार्गावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक बसमध्ये विद्यार्थ्यांचे पास स्वीकारले जात नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बजरंग सोनवणे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे विद्यार्थी पास सवलत तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.

केज-कळंब मार्गावर इलेक्ट्रिक बस सुरू झाल्यापासून साळेगाव, माळेगाव, शेलगाव गांजी, बोबडेवाडी, सुकळी, सातेफळ, मांगवडगाव, हदगाव, डोका, सारूकवाडी, चिंचोली माळी या भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पास सुविधा मिळत नसल्याने दररोज तिकीट काढावे लागत आहे. यामुळे पालकांवर आर्थिक भार पडत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी खा. सोनवणे यांच्याकडे केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेत खा. सोनवणे यांनी परिवहन विभागाला निर्देश देण्याची मागणी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. तसेच इलेक्ट्रिक बसमध्ये पास सुविधा शक्य नसल्यास या मार्गावर साध्या एस.टी. बसच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी पर्यायी मागणीही त्यांनी केली आहे.

धारूर-कळंब आगाराला पत्र

खा. सोनवणे यांनी धारूर आणि कळंब आगार प्रमुखांनाही याबाबत पत्र दिले आहे. तर साळेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच कैलास जाधव पाटील यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...