विश्वजीत गंडले/घाटनांदुर: गाडीचा हॉर्न का वाजवला, या क्षुल्लक कारणावरून इर्टिगा चालकाला शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर रेल्वे स्टेशन समोर घडली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अनिल लिंबाजी बडे (वय ५५, रा. चौपनवाडी) हे आपल्या इर्टिगा गाडीने (MH 28 AW 6265) घाटनांदूरहून चोपनवाडीकडे जात होते. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते ८:३० वाजता घाटनांदूर रेल्वे स्टेशन समोरील कच्च्या रस्त्यावर पुढे चाललेल्या आपे रिक्षाला (MH 22 U 2078) त्यांनी हॉर्न वाजवला.याचा राग आल्याने आरोपी श्रावण बापुराव चव्हाण याने “सारखा हॉर्न का वाजवतो?” असे म्हणत शिवीगाळ केली, छातीत बुक्क्या मारल्या आणि काठीने पाठीवर व कमरेवर मारहाण केली.या प्रकरणी अनिल बडे यांच्या फिर्यादीवरून श्रावण बापुराव चव्हाण, अमोल बापुराव चव्हाण, रेणुका दिलीप चव्हाण, कविता जाधव (सर्व रा. लेंडेवाडी तांडा, ता. परळी, जि. बीड) अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३८०/२०२६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोउपनि डोंगरे करत आहेत.
साक्षीदारालाही मारहाण आणि गाडीची तोडफोड
भांडण सोडवण्यासाठी आलेले साक्षीदार कृष्णा भंडेकर यांना आरोपी अमोल चव्हाण याने काठीने मारहाण केली, तर कोंडीबा भताने यांना इतर दोन महिलांनी लाथाबुक्क्यांनी मारले.आरोपींनी गाडीवर काठ्या मारून नुकसान केले आणि “जीवे मारू” अशी धमकी दिली. या झटापटीत अनिल बडे यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट गहाळ झाले असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
पार्श्वभूमी:
या प्रकरणाच्या दोन दिवस आधी याच वादातून फिर्यादी अनिल बडे यांच्यावर देखील तक्रार दाखल झाली होती, याची बातमी आम्ही यापूर्वी प्रकाशित केली होती.
सविस्तर वाचा:
त्यामुळे घाटनांदूर हॉर्न वादात आता परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून, अंबाजोगाई ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.
