परळी वैजनाथ/प्रतिनिधी : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील व सध्या परळी वैजनाथ येथे वास्तव्यास असलेला होतकरू विद्यार्थी हर्षवर्धन गौतम गंडले यांची BAMS अर्थात बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. त्याची श्री मिश्री आयुर्वेद महाविद्यालय, शेलगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना येथील नामांकित आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्रता सिद्ध झाली आहे.
हर्षवर्धन हा सर्वसामान्य कुटुंबातील जिद्दी विद्यार्थी असून त्याने लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्याचे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण परळी वैजनाथ येथील फाउंडेशन स्कूलमध्ये झाले. शालेय जीवनापासूनच तो अभ्यासात हुशार आणि शिस्तप्रिय विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर त्याने वैद्यनाथ महाविद्यालय, परळी वैजनाथ येथे अकरावी-बारावीचे शिक्षण पूर्ण केले. तेथेही त्याने चांगले गुण संपादन करून आपली वैद्यकीय प्रवेशाची वाट मोकळी केली.
अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या NEET सारख्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवत त्याने BAMS साठी पात्रता मिळवली आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही शहरातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने स्पर्धा करत त्याने हे यश संपादन केले आहे. त्याच्या या यशात त्याच्या आई-वडिलांसह शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
हर्षवर्धनच्या या निवडीमुळे घाटनांदूरसह परळी वैजनाथ परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्याच्या या यशाबद्दल आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र परिवार, शिक्षकवृंद आणि घाटनांदूर ग्रामस्थांकडून त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून पुढील वैद्यकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
