गौतम बचुटे/केज: विलास घुले खून प्रकरणात मुख्य आरोपींना अटक करा, या मागणीसाठी जमावबंदी झुगारून रस्ता रोको केल्याप्रकरणी आता आंदोलकांवरच गुन्हा दाखल झाला आहे.
केज-बीड महामार्गावर टाकळी फाटा येथे दि. 12 सप्टेंबर रोजी 5 तास रस्ता रोको करून वाहतूक रोखल्याप्रकरणी मयत विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले, बाळासाहेब सानप, संजय केदार यांच्यासह एकूण 48 जणांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
काय आहे प्रकरण?
विलास घुले यांचा मित्र उमेश माने याच्यावर एका महिलेचा लैंगिक छळ केल्याचा संशय घेऊन जमाव मारहाण करत होता. मित्राला सोडवायला गेलेल्या विलास घुले यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला होता.
या प्रकरणात मयताचे भाऊ रमेश घुले यांनी पुरवणी जबाबात खा. बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे हे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. याच मागणीसाठी हा रस्ता रोको करण्यात आला होता.
केज पोलिसांनी API प्रल्हाद चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. 585/2026, BNS कलम 189(2), 126(2), 123 व MPA कलम 135 अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास HC तुकाराम मुरकुटे हे PI राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
