अंबाजोगाई/प्रतिनिधी: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षा व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बीड पोलिसांच्या वतीने अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सर्व दुकानदार व व्यापारी बांधवांसाठी कडक नियमावली आणि अत्यंत महत्त्वाचे आवाहन जारी करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी तसेच नियमित दुकानांमध्ये आवश्यक वैध परवान्याशिवाय फटाक्यांची विक्री किंवा साठवणूक करू नये, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

यापूर्वी अंबाजोगाई शहरातील खोलेश्वर मंदिर परिसरात फटाके विक्रीचे केंद्र भरत असे. परंतु, मागील काही वर्षांत या भागात लोकवस्ती व नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून हे फटाका विक्री केंद्र आता स्थलांतरित करण्यात आले आहे. अंबाजोगाई तालुका फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने खंदारे मंगल कार्यालयाच्या बाजूला, स्व. विमलताई मुंदडा चौक, रिंग रोड, अंबाजोगाई या नवीन ठिकाणी अधिकृत फटाका मार्केट भरविण्यात येणार आहे.

पोलीस प्रशासनाचे महत्त्वाचे निर्देश व मार्गदर्शक तत्त्वे:

  वैध परवाना अनिवार्य: परवान्याशिवाय कोणत्याही प्रकारची फटाक्यांची विक्री किंवा साठवणूक करू नये. किराणा, कापड, जनरल स्टोअर्स व इतर नियमित दुकानांमध्ये फटाके विक्री करण्यास सक्त मनाई आहे.

  नव्या जागेवरच विक्री: प्रशासनाने ठरवून दिलेल्या आणि परवान्यात नमूद केलेल्या (रिंग रोडवरील नवीन फटाका मार्केट) मर्यादेतच विक्री करावी.

  गर्दीच्या ठिकाणी स्टॉलला प्रतिबंध: रस्ते, पदपथ किंवा इतर सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी अनधिकृत स्टॉल लावून फटाके विक्री करण्यास मज्जाव आहे.

  अग्निसुरक्षा नियमांचे पालन: दुकान किंवा स्टॉल परिसरात अग्निशामक यंत्रणा व सुरक्षेची पुरेशी उपाययोजना करणे अनिवार्य आहे.

नियम मोडल्यास होणार कडक कायदेशीर कारवाई:

पोलिसांच्या या आवाहनाचे उल्लंघन करून विनापरवाना किंवा प्रतिबंधित क्षेत्रात फटाक्यांची विक्री अथवा साठवणूक करताना कोणी आढळल्यास, त्यांच्यावर ‘Explosives Act, 1884 चे कलम 9B’ तसेच ‘Explosives Rules, 2008’ मधील लागू तरतुदींनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शहर पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...