अंबाजोगाई-:महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवात केवळ धार्मिक विधीच नाही, तर सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मोठी मेजवानी असते. याच महोत्सवात युवा गायक सार्थक राजेश गोस्वामी यांच्या सुमधुर गायनाने भाविकांना स्वरब्रह्माची अनुभूती दिली.
नवीन पिढीतील उमलता गायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सार्थकने आपल्या गायनाने योगेश्वरीच्या दरबारात भक्ती, भाव आणि शास्त्रीयतेचा सुंदर संगम घडवला.त्याने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ‘पंढरीचा वास चंद्रभागे स्नान’ या भक्तिगीताने केली आणि अवघा मंडप विठ्ठलमय झाला. त्यानंतर त्याने ‘तू सुखकर्ता तू दुःखहर्ता’ म्हणून गणरायाला वंदन केले.
आपल्या बहारदार आवाजात त्याने ‘या भवनातील गीत पुराणे’, ‘लागी करेजवा कटार’, ‘देवा घरचे ज्ञात कुणाला’, ‘गुंतता हृदय हे’अशी एकापेक्षा एक सरस मराठी-हिंदी गीते सादर केली. कार्यक्रमाचा कळस म्हणजे त्याने सादर केलेले ‘बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात’ हे भावगीत. या गीताने उपस्थित रसिकांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात न्हाऊन निघाले.सार्थकच्या या सुमधुर गायनाला तबल्यावर उल्हास पांडे* यांनी दमदार ठेका धरला, तर हार्मोनियमवर अशोक खंदारे यांनी सुरेल साथसंगत केली.
अभिजात गाण्याची जाण, सुरांवरची पकड आणि भावपूर्ण सादरीकरण यामुळे सार्थककडे अंबाजोगाईच्या सांस्कृतिक क्षेत्रातील उदयोन्मुख आणि उमलता गायक म्हणून पाहिले जात आहे. लहान वयातही त्याने मिळवलेली परिपक्वता कौतुकास्पद आहे.या कार्यक्रमास भाविक, रसिक श्रोते आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री योगेश्वरी नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने सार्थक गोस्वामी आणि त्याच्या साथीदार कलाकारांचे कौतुक करण्यात आले.
