अंबाजोगाई : भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री खोलेश्वर संकुलाच्या वतीने आयोजित अमृत दौडमध्ये आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी अनवाणी पायांनी धावत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या रमाबाई रणवीर यांच्या जिद्दीचे आणि संघर्षाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कामगिरीची दखल घेत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून दिल्ली येथील सुपर सिस्टिम या सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना १ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश,तर संस्थेच्या वतीने २१ हजार रुपयांचा धनादेश संस्थेचे कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य, प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांत मुळे व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

अमृत दौडमध्ये रमाबाई रणवीर यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अनवाणी पायांनी धावत त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. आणि उपस्थित सर्व स्पर्धकांना आपल्या जिद्दीने आश्चर्यचकित केले. एका आईची आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी असलेली तळमळ, संघर्ष करण्याची तयारी आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रेरणादायी दर्शन घडले.
रमाबाई यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवर विविध संस्थांनी दखल घेत त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. याच सामाजिक जाणिवेतून आणि समाजाचे ऋण मान्य करण्याच्या भावनेतून भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने त्यांना बक्षिसा व्यतिरिक्त २१ हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. श्री खोलेश्वर संकुलाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमातून शिक्षणासाठीचा संघर्ष, महिलांची जिद्द, सामाजिक बांधिलकी आणि समरसतेची भावना यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. यावेळी संकुलातील शिक्षक, प्राध्यापक, ग्रंथपाल तसेच नवदाम्पत्य संमेलनानिमित्त एकत्रित आलेल्या मान्यवरांनी रमाबाई यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.
रमाबाई रणवीर यांचा संघर्ष हा केवळ एका स्पर्धेतील विजय नसून, मुलीच्या शिक्षणासाठी जिद्दीने उभ्या राहिलेल्या एका आईच्या सामर्थ्याचा आणि समाजातील संवेदनशीलतेचा प्रेरणादायी संदेश आहे.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य आणि प्रशासकीय समन्वयक अधिकारी प्रा. चंद्रकांत मुळे यांच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रामभाऊ कुलकर्णी व वर्षा मुंडे, स्थानिक कार्यवाह किरण कोदरकर तसेच श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष अविनाश मुडेगावकर उपस्थित होते.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...