अंबाजोगाई:- शक्तीपीठ श्री योगेश्वरी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवातील मुख्य पूजा सोहळा सोमवारी भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळी साडेअकरा वाजता होम-हवन आणि पूर्णाहुतीनंतर देवीची विधिवत महापूजा करण्यात आली.अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे सोनवणे व त्यांचे पती हरिश्चंद्र सोनवणे यांनी जोडप्याने या महापूजेचा मान मिळवला. मंत्रघोषात झालेल्या पूजेनंतर महाआरती झाली. आरतीनंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा ओघ प्रचंड वाढला होता, विशेषतः महिला भाविकांची मोठी रांग लागली होती.
दरवर्षीप्रमाणे यंदाही ११ ते २० ऑक्टोबर दरम्यान हा उत्सव साजरा होत आहे. आठवडाभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक अंबाजोगाईत येत आहेत.या पूजाविधी प्रसंगी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे, उपाध्यक्ष अक्षय मुंदडा, सचिव गिरधारीलाल भराडिया, सहसचिव कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष पूजा राम कुलकर्णी, उत्सव प्रमुख उल्हास पांडे यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ, मुख्य पुजारी सारंग पुजारी, मानकरी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कमिटीकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंदिर परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
उद्या पालखी सोहळा
उत्सवाचा समारोप मंगळवारी विजयादशमीला पालखी सोहळ्याने होणार आहे. दुपारी एक वाजता देवीची पालखी सीमोल्लंघनासाठी नगर भ्रमणासाठी निघेल. पालखी पारंपारिक मार्गानेच मार्गस्थ होणार असल्याचे अध्यक्ष विलास तरंगे यांनी सांगितले.
