अंबाजोगाई (प्रतिनिधी): येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या पाच प्रतिभावंत खेळाडूंची विविध क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील स्पर्धांसाठी निवड झाली आहे. या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून शालेय क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यश संपादन केलेल्या खेळाडूंमध्ये आर्यन जिरे याची राष्ट्रीय स्तरावरील कुराश स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर कल्पेश जाधव याची राज्यस्तरीय तलवारबाजी (फेन्सिंग), हर्षवर्धन जगताप याची राज्यस्तरीय रायफल शूटिंग, तर शौर्य लोमटे व आरोही लोमटे यांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश त्यांच्या सातत्यपूर्ण सरावाचे, कठोर परिश्रमाचे आणि क्रीडा प्रशिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचे फलित आहे. दैनंदिन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी न्यू व्हिजन पब्लिक स्कूल सातत्याने प्रयत्नशील असते. या उल्लेखनीय यशाबद्दल श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, व्यवस्थापकीय संचालक संकेत मोदी आणि कार्यकारी संचालिका डिंपल मोदी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे प्राचार्य डॉ. पांडुरंग के. पाटील व मुख्याध्यापक प्रदीप सोनी यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रगती करत अंबाजोगाई शहराचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक मंगेश वानखेडे, प्रियंका गीते व रोहित मेंडके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच समन्वयक रवींद्र राजगुरू, जयशंकर त्रिपाठी, शारदा शिंदे, नितीन घोबाळे, विष्णू चिंचोले व शिल्पा पौळ यांनी कौतुक केले. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही न्यू व्हिजनचे विद्यार्थी वेगळी ओळख निर्माण करत असून या निवडीमुळे शाळेच्या यशस्वी वाटचालीला नवी उंची मिळाली आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...