आष्टी: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची आणि तिचे खासगी फोटो समाजमाध्यमावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला २६ वर्षीय असून तिने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, ऑगस्ट २०२१ ते ऑक्टोबर २०२६ या प्रदीर्घ कालावधीत आरोपीने तिला लग्नाचे खोटे आश्वासन दिले. या आमिषाला बळी पडून महिलेवर वारंवार अत्याचार झाल्याचा आरोप आहे.जेव्हा पीडित महिलेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपीने तिला टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर तिचे खासगी क्षणातील फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवून तिला बदनाम करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या धमक्यांना घाबरून अखेर पीडित महिलेने थेट पोलीस ठाणे गाठून न्याय मागितला.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आष्टी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ६९ (लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध), कलम ६४(२) आणि कलम ३५१(२) (धमकावणे) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(ई) (खासगी फोटोचा गैरवापर) आणि कलम ६७(अ) (अश्लील सामग्री प्रसारित करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सध्या या घटनेचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे हे करत असून, आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. या तपासानंतर या प्रकरणातील खरी माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...