गौतम बचुटे/केज:- केज तालुक्यातील साळेगाव येथील जनावरांच्या आठवडी बाजारातून एका ५५ वर्षीय इसमाचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २९ ऑक्टोबर, गुरुवार रोजी टाकळी ता. केज येथील रामहरी कारभारी घुले, वय ५५ वर्षे हे केज तालुक्यातील साळेगाव येथील जनावरांच्या आठवडी बाजारात जनावरे खरेदी करण्यासाठी आले होते. बाजारात असतानाच दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांची पत्नी सौ. मंगल घुले यांना फोन करून ते बाजारातून निघाले असून घरी येत असल्याचे सांगितले.मात्र बराच वेळ झाला तरी रामहरी घुले हे घरी आलेच नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद लागत होता. त्यानंतर कुटुंबीयांनी साळेगाव बाजारात आणि येणाऱ्या रस्त्यावर सर्वत्र शोध घेतला, परंतु ते कुठेही आढळून आले नाहीत.

बेपत्ता रामहरी घुले यांचे वर्णन – वय ५५ वर्षे, रंग सावळा, उंची अंदाजे ५ फूट, अंगात पांढरा कुर्ता आणि पांढरी पँट परिधान केलेली आहे.या प्रकरणी त्यांचे नातेवाईक रमेश घुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६८७/२०२६, कलम १४०(३) भारतीय न्याय संहिता नुसार नोंद करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गोरख फड हे करीत आहेत.

ही बातमी ही वाचा….

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...