छत्रपती संभाजीनगर: शहराचे अधिकृत नाव छत्रपती संभाजीनगर असतानाही काही महाविद्यालये अजूनही जुन्याच औरंगाबाद नावाचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना सक्त ताकीद दिली आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव यांनी २८ ऑक्टोबर रोजी याबाबत परिपत्रक काढले आहे.
त्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, विद्यापीठाने नियुक्त केलेल्या विविध समित्यांसाठी महाविद्यालयांकडून जे नमुने (फॉर्मेट) वापरले जातात, त्यात औरंगाबाद हे जुने नाव असल्याचे आढळून आले आहे. शहराचे अधिकृत नाव छत्रपती संभाजीनगर असताना जुने नाव वापरणे चुकीचे आहे. त्यामुळे यापुढे औरंगाबाद नाव असलेले जुने नमुने वापरू नयेत. त्याऐवजी छत्रपती संभाजीनगर या अधिकृत नावाचा उल्लेख असलेलेच सुधारित नमुने वापरावेत, असे आदेश विद्यापीठाने दिले आहेत. या सूचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. हे परिपत्रक कुलगुरू, प्र. कुलगुरू, सर्व अधिष्ठाता आणि सर्व संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य यांना पाठवण्यात आले आहे.
संकेतस्थळावरील जुने फॉर्म हटवणार
विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरही औरंगाबाद नाव असलेले जुने नमुने असतील तर त्यांचे पुनरावलोकन करून ते तात्काळ काढून टाकण्याच्या सूचना UNIC विभागाच्या संचालकांना देण्यात आल्या आहेत.
