अंबाजोगाई/प्रतिनिधी: गावानं ठरवलं तर काय होऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण अंबाजोगाई तालुक्यातील नांदडी ग्रामपंचायतीनं घालून दिलं आहे. मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानातून गावातील एकाही निराधार ज्येष्ठाला उपाशी राहू लागू नये, म्हणून येथे ‘तृप्ती सामुदायिक भोजनगृह’ सुरू करण्यात आले आहे.
या भोजनगृहाच्या शेडचे आणि गावासाठी लावण्यात आलेल्या तक्रार पेटीचे उद्घाटन शनिवारी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख डॉ. प्रतिभा थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. थोरात म्हणाल्या, “तृप्ती ही फक्त जेवणाची सोय नाही, तर तो निराधारांचा आत्मसन्मान आहे. मानवलोकने खऱ्या अर्थाने ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे.” या कार्यक्रमाला डॉ. अशोक थोरात, मानवलोकचे अमन लोहिया, जयश्री जाधव, साबेरा शेख, सुधाकर देशमुख, आबासाहेब देशमुख, ग्रामसेवक सुनील मामडगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गौरी देशमुख व अंजली देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
लोकवर्गणीतून सुरू झाली चळवळ
विशेष म्हणजे हे किचन शासनाच्या पैशावर नाही, तर गावकऱ्यांनी जमवलेल्या लोकवाट्यातून सुरू झाले आहे. मानवलोक आणि ग्रामपंचायतीने हातात हात घालून हा उपक्रम उभा केला आहे.
नागरीकांसाठी तक्रार पेटी
गावात कोणाचीही अडचण असेल तर ती थेट ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचावी म्हणून तक्रार पेटीही लावण्यात आली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत कोणीही या पेटीत आपली तक्रार टाकू शकतो आणि तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाणार असल्याची माहिती सरपंच महादेवी देशमुख यांनी दिली.
