अंबाजोगाई (प्रतिनिधी):
अंबाजोगाई शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली नागरिकांची स्वमालकीची घरे पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषद प्रशासनाने कोणतीही कायदेशीर नोटीस न देता थेट कारवाई केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या अमानुष कारवाईमुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 02) अंबाजोगाई शहरात संतप्त नागरिकांनी धडक आक्रोश मोर्चा काढला.

हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणाबाजी करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दिनांक ३० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या दोन दिवसात सार्वजनिक बांधकाम विभाग, अंबाजोगाई आणि नगर परिषद प्रशासनाने संयुक्तपणे अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान रस्त्या लगत असलेली व्यावसायिक दुकाने काढण्यात आली. मात्र या कारवाईसोबतच नागरिकांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत असलेली आणि वडिलोपार्जित असलेली निवासी घरे देखील पाडण्यात आली. नागरिक वडिलोपार्जित घरांमध्ये वास्तव्य करीत होते. त्यांना कोणतीही नोटीस न देता आणि त्यांची संमती न घेता घरे पाडल्याने संताप व्यक्त होत आहे.या प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

प्रमुख मागण्या

यामध्ये दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, बाधित कुटुंबांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, हनुमान नगर सर्व्हे नंबर ६१३ मधील सरकारी रस्ता खुला करावा, साठे नगर व नागझरीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या घरांना संरक्षण द्यावे आणि यशवंतराव चव्हाण चौकातील पारधी कुटुंबाचे पुनर्वसन होईपर्यंत संरक्षण द्यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.या मोर्चात भीमराव सरवदे, अशोक पोलके, धी-राष्ट्रपाल, अक्षय भुंबे, प्रदीप लाडके, राम उगले, नितीन सरवदे, रामकिसन काशिद यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले होते. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...