परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
परळी येथील जुने थर्मल परिसरात अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत ५७ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. पांडुरंग संतराम वाघमारे (वय ५७, रा. शिवाजीनगर, परळी वै.) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जुने थर्मल परिसरात अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगय व निष्काळजीपणे चालवून वाघमारे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांना गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला.
या प्रकरणी मृत पांडुरंग संतराम वाघमारे यांचा मुलगा अनंत पांडुरंग वाघमारे (वय १९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६९/२०२६ कलम २८१, १०६(१) बीएनएस सह कलम १३४/१८७ मोटार वाहन कायदा अन्वये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
