गौतम बचुटे/केज:- केज तालुक्यातील देवगाव येथील एका ४३ वर्षीय इसमाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १ नोव्हेंबर रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश वैजिनाथ मुंडे (वय ४३ वर्षे, रा. देवगाव, ता. केज) हे १ नोव्हेंबर रोजी रात्री गावात असताना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यांना पळवून नेऊन अपहरण केले. घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे व परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा कोणताही तपास लागला नाही.
अखेर त्यांचे वडील वैजिनाथ भानुदास मुंडे यांनी दि. ३ नोव्हेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
देवगाव सारख्या छोट्या गावातून भरवस्तीतून व्यक्तीचे अपहरण झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. नेमके अपहरण कोणत्या कारणातून झाले, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अपहृत व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार राजू वंजारे हे करीत आहेत.
