विश्वजीत गंडले/परळी वैजनाथ: परळी वैजनाथ शहरातील मध्यवर्ती असलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत शिंदे शू मार्ट हे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टॉवर चौक परिसरातील शिंदे शू मार्ट या दुकानाला अचानक आग लागली. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते.
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी परळी पोलीस पुढील तपास करत आहेत.

