विश्वजीत गंडले/परळी वैजनाथ: फेसबुकवर दिसलेल्या स्वस्त साडीच्या जाहिरातीवर विश्वास ठेवणं एका वृद्ध महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. अवघ्या 600 रुपयांत दोन साड्या मागवण्याच्या नादात तब्बल 8 लाख 64 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार परळी शहरात उघडकीस आला आहे.

फसवणूक झालेल्या महिला कलावती बाळासाहेब खरबड (वय 79, रा. गणेशपार रोड, मॉडर्न कॉलेजच्या बाजूला, परळी) येथील रहिवासी आहेत. त्यांनी फेसबुकवर साड्यांच्या कलेक्शनची एक जाहिरात पाहिली होती. जाहिरातीत दिलेल्या नंबरवर संपर्क करून त्यांनी केवळ 600 रुपयांत दोन साड्यांची ऑर्डर नोंदवली.

मात्र काही दिवस उलटूनही साड्या न आल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीला विचारणा केली. यानंतर सायबर भामट्यांनी आपलं जाळं टाकण्यास सुरुवात केली. “तुमचं पार्सल कस्टममध्ये अडकलं आहे, जीएसटी आणि इतर चार्जेस भरावे लागतील” असं सांगून आरोपींनी वेळोवेळी वेगवेगळी कारणं देत पैसे उकळण्यास सुरुवात केली.या भूलथापांना बळी पडून कलावती यांनी आपल्या बँक खात्यातून तब्बल 8 लाख 64 हजार 924 रुपये आरोपींच्या खात्यावर पाठवले.

बीड सायबर पोलिसात गुन्हा दाखल

आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कलावती खरबड यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध बीड सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनावणे हे करीत आहेत.

बीड न्यूज एक्सप्रेसचे आवाहन – फेसबुक, इंस्टाग्रामवरील अशा आकर्षक जाहिरातींवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही अनोळखी लिंकवर किंवा QR कोडवर पैसे पाठवण्यापूर्वी खात्री करा.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...