डी. सदानंद/अंबाजोगाई: मंदिरांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक अंबाजोगाई शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांची सुधारणा झाली असली तरी, काही महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या रस्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
शहरातील देवी मंदिरापासून मुकुंदराज स्वामी यांच्या समाधीस्थळाकडे जाणारा रस्ता हा भाविक आणि पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याच मार्गावर दासोपंत स्वामींची समाधी असून, या परिसरात मोठ्या प्रमाणात स्मशानभूमी (मसनवाटिका) देखील आहे. या संपूर्ण परिसरातील रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तो पूर्ववत करावा, अशी जोरदार मागणी अंबाजोगाईकर नागरिकांतून होत आहे. नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
डांबरी रस्त्याचे रुपांतर खड्डेमय रस्त्यात
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी या ठिकाणी चांगला डांबरी रस्ता होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून देखभाल न झाल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी डांबर पूर्णपणे निघून गेले असून केवळ खडी आणि माती शिल्लक राहिली आहे.हा रस्ता अंबाजोगाईहून येल्डा गावाकडे जाणारा महत्त्वाचा जोडरस्ता देखील आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसभर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना त्रास
अंबाजोगाई शहरातील अनेक नागरिक पहाटेच्या वेळी याच मार्गाने मुकुंदराज परिसरात मॉर्निंग वॉक आणि व्यायामासाठी जातात. खराब रस्त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना चालणे देखील कठीण झाले आहे. रस्त्याच्या बाजूला नालीचे बांधकाम करण्यात आले आहे, मात्र रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने त्या कामाचा उपयोग होत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
पर्यटनावर होतोय परिणाम
अंबाजोगाई शहराला 50 हून अधिक प्राचीन मंदिरांचा समृद्ध वारसा लाभला आहे. दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक येथील योगेश्वरी देवी मंदिर, दासोपंत समाधी आणि मुकुंदराज समाधीला भेट देण्यासाठी येतात. या सर्वांना याच खराब रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. यामुळे शहराच्या प्रतिमेवर देखील परिणाम होत आहे. एकेकाळी या परिसरात रस्ते, पथदिवे आणि विजेच्या खांबांची चांगली व्यवस्था होती. आता मात्र सर्वच यंत्रणा कोलमडली आहे.
