शंभर वर्षांत न आटलेला लांडगदरा तलाव आटला
अंबाजोगाई/प्रतिनिधी:- धावडी गावात यंदा भीषण पाणीटंचाईने कहर केला आहे. गेल्या शंभर वर्षात कधीही न घडलेली परिस्थिती यंदा धावडीकरांना पाहावी लागत आहे. धावडी गावाच्या आजूबाजूला असलेले सर्व लहान-मोठे तळे, बंधारे आणि पाणवठे पूर्णपणे कोरडे पडले आहेत. पावसाने यंदा पाठ फिरवल्याने या तलावांमध्ये पाण्याचा एक थेंबही शिल्लक नाही.

गावाची शान आणि अनेक पिढ्यांची तहान भागवणारा ऐतिहासिक लांडगदरा तलाव तब्बल शंभर वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्णपणे आटला आहे. गावातील जेष्ठ नागरिक सांगतात की त्यांच्या आजोबांच्या काळातही हा तलाव कधी आटला नव्हता, पण यंदाच्या भीषण परिस्थितीमुळे तलावाच्या तळाचेही फक्त भेगा पडलेली जमीन दिसत आहे. लांडगदरा आटल्याने गावातील भूजल पातळी पूर्णपणे खालावली असून गावातील सर्व बोरवेल आणि विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना दररोज दोन-दोन किलोमीटर वणवण फिरावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
पाणी टंचाईचा फटका मुक्या जीवांना
पाण्याच्या या भीषण टंचाईचा सर्वात जास्त फटका मुक्या जीवांना बसत आहे. पाण्याच्या शोधात वणवण फिरणाऱ्या पक्षांना पाणी मिळत नसल्याने ते जागीच कोसळत आहेत. आज सकाळी धावडी येथील एका शेतात एका कबुतराचा पाण्याविना तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. शेतात मृत अवस्थेत पडलेले कबुतर पाहून शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. ही घटना मानवी मनाला चटका लावणारी आहे.

मुक्या जनावरांसाठी पाण्याची सोय परंतू पाणी किती दिवस राहील
दुष्काळामुळे गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली असताना मुक्या जनावरांची तहान भागवण्यासाठी शेतकरी सिताराम तरकसे गुरूजी यांनी मोठा दिलदारपणा दाखवला आहे.त्यांनी आपल्या पिपळ शेतातील विहीर जनावरांसाठी मोकळी करून दिली आहे. या विहिरीवर असलेला सोलर पंप चालू करून गावकरी आपल्या जनावरांची तहान भागवत आहेत.मात्र, या विहिरीनेही आता तळ गाठला असून हे पाणी किती दिवस पुरेल हे सांगता येत नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
पाणी टंचाई समिती स्थापन
पाणी टंचाई दूर करण्यासाठी गावात पाणी टंचाई समिती स्थापन करण्यात आली आहे. नागरिकांना कसे पाणी मिळेल यासाठी ही समिती काम करीत आहे.गावात पाण्याच्या टँकरची सोय करण्यासाठी ही समिती प्रयत्न करीत आहे. गावातील भीषण टंचाई लक्षात घेऊन पंचायत समितीने गावात पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी गावकऱ्यांमधून होत आहे.

“पाण्याची कमतरता आणि एकदम वाढणारी उष्णता यामुळे पक्षी भोवळ येऊन पडतात. जर असा भोवळ येऊन पक्षी पडलेला दिसला तर त्यास गुळपाण्याचे मिश्रण दिले तर तो जगू शकतो. सध्या उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी आपापल्या गॅलरीमध्ये किंवा झाडाखाली मातीच्या झाकणीत पाणी ठेवावे, जेणेकरून पक्षी जगतील.”– रत्नाकर निकम (पक्षी मित्र, अंबाजोगाई, मो. क्र. 7972050217)
