अंबाजोगाई/प्रतिनिधी: महामार्गावरील सायगाव जवळ रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.मृत तरुणाची ओळख रत्नदिप भिमराव गजधने (वय 29) अशी झाली आहे. तर त्याच्यासोबत असलेला गोविंद वाघमारे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर आंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळी सणासाठी रत्नदिपची पत्नी माहेरी गेली होती. पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीच्या भेटीसाठी रत्नदिप मामाच्या मुलासोबत गेला होता. भेट घेऊन तो पुन्हा घरी परतत होता. घरी परतताना सायगाव येथे त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनचालकाने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलचे दोन तुकडे झाले. या अपघातात रत्नदिपचा जागीच मृत्यू झाला.

रुग्णवाहिकेला एक तास उशीर, नागरिक संतप्त

अपघाताची माहिती मिळताच जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. मात्र रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल एक तास उशिरा आल्याचा आरोप उपस्थित नागरिक आणि नातेवाईकांनी केला आहे. ऐनवेळी मदतीची गरज असताना रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.”आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वेळेवर पोहचत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी मदत कोणाकडे मागायची?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका सेवेच्या तत्परतेबाबत मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.या घटनेचा अधिक तपास बर्दापूर पोलीस करीत आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...