अंबाजोगाई /बीएन वृत्तसेवा: कृषी उत्पन्न बाजार समिती, अंबाजोगाईने सन २००२ मध्ये ठराव क्र. १२ अन्वये भूखंड वाटप करूनही व्यवसायास परवानगी नाकारल्याने परवानाधारक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याच्या निषेधार्थ येत्या १२ नोव्हेंबरपासून बाजार समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
सोमवार दि. ९ नोव्हेंबर रोजी हॉटेल कृष्णाई येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यापाऱ्यांनी ही माहिती दिली. बाजार समितीने २७ फेब्रुवारी २००२ रोजी ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने भूखंड वाटप केले होते. नोंदणीकृत भाडेपट्टे, नियमित वार्षिक भाडे आणि लायसन्स नूतनीकरण असतानाही बांधकाम व व्यवसायास अडथळा आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकरणात पणनमंत्री, पणन संचालक व उच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला असल्याचा दावाही व्यापाऱ्यांनी केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेला दशरथ कदम, भागवत चाटे, विठ्ठल भुरे, चनबस आप्पा बर्दापूरे, जयकुमार लोढा यांच्यासह व्यापारी उपस्थित होत आहे.



