धाराशिव/येडशी – सणासुदीच्या आनंदात संपूर्ण महाराष्ट्र असताना धाराशिव जिल्ह्याला हादरवणारी एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. येडशी येथील मध्यवर्ती बाजारपेठेत मध्यरात्री लागलेल्या आगीने करंडे कुटुंबाचा घास घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येडशीतील जुने व्यापारी असलेल्या गोविंद करंडे आणि उत्तम करंडे यांचे करंडे किराणा स्टोअर्स नावाने दुकान आहे. दिवाळी असल्याने दुकानात नवीन माल भरलेला होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास दुकानातून धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. आरडाओरडा होईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.धक्कादायक बाब म्हणजे या दुकानाच्या पहिल्या मजल्यावरच करंडे कुटुंबाचे वास्तव्य होते. खालच्या दुकानाला आग लागल्याने वर जाण्याचा एकमेव मार्ग बंद झाला.

धुराने संपूर्ण घर भरल्याने कुटुंबातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. चार जणांचा धुराने गुदमरून तर दोन जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.या आगीत ज्यांचा मृत्यू झाला त्यात घरातील जेष्ठ, तरुण आणि लहान मुले अशा तिन्ही पिढ्यांचा समावेश आहे.

या घटनेने गावातील प्रत्येक व्यक्ती सुन्न झाली आहे. दिवाळीच्या दिवशीच गावातील सहा चिता एकत्र पेटणार असल्याने संपूर्ण गाव हळहळत आहे.स्थानिकांनी सांगितले की, दिवाळीनिमित्त घरात लावलेल्या तेलाच्या पणत्या आणि दुकानातील फटाक्यांच्या माळा हे आगीचे कारण असू शकते. मात्र, धाराशिव ग्रामीण पोलीस आणि अग्निशमन विभाग याबाबत अधिकृत तपास करत आहेत.रात्रीच घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. धाराशिव जिल्हा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे आज येडशी बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...