गौतम बचुटे/केज: तालुक्यातील हंगेवाडी ते मस्साजोग रोडवर आवादा एनर्जी कंपनीच्या इलेक्ट्रिक मॅनेजरवर जीवघेणा हल्ला झाला आहे. बिमल कांतिदास (वय ३८, रा. आसाम) हे स्कॉर्पिओने जात असताना गणेश काचुळे आणि त्याच्या दोन साथीदारांनी विना नंबरच्या गाडीने त्यांची गाडी आडवी लावली.
गाडीच्या काचा फोडून त्यांना बाहेर ओढून लोखंडी रॉड आणि पाईपने मारहाण करण्यात आली. यात बिमल कांतिदास गंभीर जखमी झाले. ड्रायव्हर शिवाजी केदार यालाही धमकी देण्यात आली.
हा हल्ला सूडबुद्धीतून झाल्याची माहिती आहे. आरोपी गणेश काचुळे हा आधी आवादा कंपनीत ड्रायव्हर होता. मॅनेजरने तक्रार केल्याने त्याला कामावरून काढले होते, याच रागातून त्याने हल्ला केला. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७०४/२०२५ दाखल झाला असून पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे तपास करत आहेत.



