अंबेजोगाई/बीएन वृत्तसेवा: – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी कल्याणम् एज्युकेअर प्रा. लि. यांच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय उपक्रमशील आदर्श महिला पुरस्कार दिला जातो. यंदाचा सन 2027 चा हा मानाचा पुरस्कार अंबेजोगाई तालुक्यातील धावडी येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती विमल तुकाराम तरकसे यांना जाहीर झाला आहे.

श्रीमती विमल तरकसे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक संस्थेच्या मार्फत अंबाजोगाई तालुक्यात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. शिक्षण क्षेत्रासोबतच महिलांचे प्रश्न, ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या या निस्वार्थी आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन निवड समितीने त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली आहे.

कल्याणम् एज्युकेअर प्रा. लि. ही संस्था शिक्षणासोबतच समाजातील उपक्रमशील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करते. समाजातील स्त्री शक्तीचा सन्मान व्हावा आणि त्यांच्या कार्यातून इतर महिलांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यात राज्यभरातून निवड झालेल्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.

मुंबई येथे सोहळ्याचे आयोजन

हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते श्रीमती विमल तरकसे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे वृत्त समजताच धावडी, अंबेजोगाई आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...